Karnataka CM : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बदलणार? ‘त्या’ भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा
कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री (Karnataka CM) बदलाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. पुढील महिन्यात (मे) ती प्रक्रिया होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची दिल्लीवारी कारणीभूत ठरली आहे.

Karnataka CM : कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री (Karnataka CM) बदलाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. पुढील महिन्यात (मे) ती प्रक्रिया होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची दिल्लीवारी कारणीभूत ठरली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यासाठीचे मतदान २९ एप्रिलला होईल. त्यानंतर बंगालसह पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल ४ मे यादिवशी जाहीर केले जातील.
ते निकाल हाती आल्यानंतर काही दिवसांत कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकेल, अशी चर्चा कॉंग्रेसच्या गोटात आणि राजकीय वर्तुळात आहे.
कर्नाटकविषयीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असतानाच शिवकुमार यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे त्या चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले. साहजिकच, दिल्लीहून परतलेल्या शिवकुमार यांना पत्रकारांनी गाठले. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री बदलाविषयी कुठले भाष्य करण्याचे टाळले. राजकीय मुद्द्यांवर मी प्रसारमाध्यमांपुढे काही बोलणार नाही.
वेळ आल्यावर सर्व काही समजेलच. कॉंग्रेस श्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. कॉंग्रेस श्रेष्ठींचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला मान्य असेल, या भूमिकेचाही त्यांनी पुनरूच्चार केला. शिवकुमार यांचा वाढदिवस (१५ मे) जवळ येऊन ठेपला आहे. त्याआधी कुठली चांगली बातमी मिळणार का, या प्रश्नाचेही उत्तर देणे त्यांनी टाळले.
कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये अडीच वर्षांचा निम्मा कार्यकाळ पूर्ण केला. तेव्हापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आणखीच तीव्र बनल्या. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात सुप्त सत्तासंघर्ष असल्याचेही दडून राहिलेले नाही.






