Karla Fire : कार्ल्यात मंडप गोदामाला भीषण आग! ४० ते ५० लाखांचा माल जळून खाक, परिसरात खळबळ
Karla Fire : मंडप व्यवसायाचे साहित्य ठेवलेल्या गोदामाला अचानक भीषण आग लागून सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
Updated On:

Karla Fire – शहरातील राजमुद्रा इव्हेंट मंडप व्यवसायाचे साहित्य ठेवलेल्या गोदामाला अचानक भीषण आग लागून सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. ज्ञानेश्वर महादु हुलावळे यांनी मोठी गुंतवणूक करून मंडप व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी केले होते. हे सर्व साहित्य गोदामात साठवून ठेवण्यात आले होते. मात्र गोदाम परिसरातील कचरा पेटवत असताना अचानक आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाला वेढले.
आगीची माहिती मिळताच गावातील तरुण आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने ती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. यानंतर लोणावळा नगरपालिका, वडगाव नगरपालिका तसेच आयआरबी कंपनीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग अखेर आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत गोदामातील मंडप व्यवसायासाठीचे मोठ्या प्रमाणावरील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





