प्रभात वृत्तसेवा कर्जत : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील १० पंचायत समिती गणांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच प्रांताधिकारी नितीनकुमार पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या उपस्थितीत पार पडला. आरक्षण सोडतीमुळे आता अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, काहींचे पत्ते कट झाले आहेत. दरम्यान, सभापती पदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी याअगोदरच राखीव असल्याने चापडगाव गणामधून निवडून येणाऱ्या पंचायत समिती सदस्यास सभापती पदाची संधी मिळणार आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. तहसीलदार कार्यालयात ही सोडत पार पडली. पंचायत समिती आरक्षणामध्ये कोंभळी गण अनुसूचित जाती स्त्री या प्रवर्गासाठी राखीव झाला, तसेच दूरगाव, राशीन, कुळधरण, भांबोरा हे गण सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गासाठी राखीव झाले. टाकळी खंडेश्वरी, मिरजगाव, चिलवडी हे गण सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गासाठी राखीव झाले. कोरेगाव गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला, तर चापडगाव गण ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाला, सभापती पदाचा चेहरा चापडगावमध्ये ठरणार आहे. हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. या सोडतीस सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता उमेदवारांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व आ.रोहित पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. दोघांसाठी ही वर्चस्वादाची लढाई असणार आहे.