कर्जत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कोणाची लागणार वर्णी?

अहिल्यानगर : काही दिवसांपासून नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आपल्याच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता. तत्पूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनीं जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नगराध्यक्षा यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्जत नगर पंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. 2 मे रोजी कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे.
नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करत नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली. याच नव्या अध्यादेशाचा आधार घेत नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभूत करत धक्का दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा २०२१ मध्ये झालेल्या कर्जत नगरपंचायत निवडनुकीमध्ये रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत राम शिंदे यांना मोठा धक्का दिला होता. यामुळे मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर दिसून आले. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मतदारसंघात रोहित पवारांचा दबदबा निर्माण झाला होता. मात्र, या पराभवाचा बदला घेण्यासाठीच सभापती राम शिंदे यांनी देखील डावपेच आखण्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
आमदार रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी राम शिंदे यांनी शरद पवार गटाचे तब्बल आठ नगरसेवक फोडले होते. नव्या कायद्यासाठी शिंदे यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यानुसार कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी ११ नगरसेवकांसह भाजपाच्या २ अशा १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. आता मात्र, कर्जत नगर पंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली असून नगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
सभापती राम शिंदेंनी माझा राजकीय बळी घेतला : माजी नगराध्यक्षा उषा राऊत
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर उषा राऊत यांनी माध्यमंशी संवाद साधत त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सत्तेचा गैरवापर व आर्थिक आमिषातून नगरसेवकांना वळवण्याचे आरोप राऊत यांनी केला. तसेच “ओबीसी नगराध्यक्ष असलेल्या महिलेला हटवण्यासाठी राज्याचा कायदा बदलला. पदाचा गैरवापर करून माझा राजकीय बळी देण्याचं काम राम शिंदे यांनी केल्याचा घणाघात उषा राऊत यांनी केला. तर यापुढे देखील कर्जत शहरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम सुरूच ठेवणार असल्याचे उषा राऊत यांनी सांगितले.



