अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती तथा भाजप नेते आमदार राम शिंदे यांच्यासोबत रात्री उशिरा बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ, तर काँग्रेसचे तीन नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपच्या राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२ आणि काँग्रेसचे ३ असे महाविकास आघाडीचे एकूण १५ नगरसेवक आहेत. दुसरीकडे भाजपला अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या. नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत, तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजी उफाळून आली. टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसतायत दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना राम शिंदे म्हणाले की, पूर्वी इतर पक्षातील नेते भाजपाला हिणवायचे, टोमणे मारायचे. त्यामुळे भाजपात काम करणारा हा अस्पृश्य असल्याची भावना निर्माण व्हायची. आता हे टिंगल टवाळी करणारेच भाजपच्या आश्रयाला येऊन बसत आहेत. याचा अर्थ आपले विचार आता सर्वांना पटायला लागले आहेत. मात्र पक्षाच्या विचारांना जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात लढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल, असे सभापती राम शिंदे यांनी म्हटले आहे. कवडगाव-गिरवली सोसायटी रोहित पवारांच्या ताब्यात जामखेड तालुक्यातील कवडगाव-गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे मिठू महादेव खोसे यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारास जोरदार टक्कर दिली. यावेळी एक मत बाद होऊन दोन्ही उमेदवारांना समान ६-६ मते पडली. यानंतर चिठ्ठीद्वारे मिठू खोसे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.