Karjat Murbad Road : उपोषण जाहीर होताच यंत्रणा हलली; कर्जत-मुरबाड राज्य मार्गावर अखेर ‘खड्डेमुक्ती’चे काम सुरू
Karjat Murbad Road : सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एमएसआरडीसीने खड्डे बुजवण्यासाठी कशेळे येथून कामाला केली सुरुवात.

Karjat Murbad Road – कर्जत- कशेळे- मुरबाड राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी एमएसआरडीसी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. त्वरित रस्ता देखभाल तथा खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर एमएसआरडीसी कार्यालयाने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
रस्त्यावरील खड्डा चुकवितांना छोटे मोठे अपघात सातत्याने होत असल्याचे निदर्शनास आल्याने उदय पाटील यांनी पुढाकार घेत या परिसरातील व्यापारी बांधवांच्या सह्यांचे निवेदन एमएसआरडीसी कार्यालयाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड यांना सादर केले होते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपअभियंता अरुण देवकाते यांना त्वरित सूचना देऊन कर्जत कशेळे मुरबाड राज्य मार्गावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहनधारकांसाठी सुस्थितीत करावा अशा सूचना दिल्या होत्या.
मात्र तरीसुद्धा संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत होते यामुळे सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी पुन्हा एकदा एमएसआरडीसी कार्यालयाला रस्ते दुरुस्तीची आठवण करून देत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर एमएसआरडीसीने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे
एमएसआरडीसी अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर सोमवारपासून कशेळे येथून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा दर्जा चांगला असावा या करिता कशेळे ग्रामस्थ स्वत: लक्ष घालत आहेत. कर्जत मुरबाड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या हद्दीतील खड्डे व्यवस्थित बुजवले जावेत या करिता स्वतः हजर राहून लक्ष द्यावे.
– उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते ,कशेळे





