Karjat: वृक्षतोडीविरोधात कर्जत बंदची हाक
Karjat : व्यापाऱ्यांना बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन

कर्जत – कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून परिसरातील वातावरण तापले आहे.
या वृक्षतोडीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन आपापल्या बाजारपेठा बंद ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न परिसरातील वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करत या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात येत आहे.
विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे, वनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
प्रस्तावित प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करून संबंधित यंत्रणांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यापारी वर्गाने बाजारपेठा बंद ठेवून पर्यावरणाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडावी, असे आवाहन नितीन सावंत यांनी केले आहे. या बंदला व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





