Kareena Kapoor: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर तिने असा दर्जा मिळवला आहे, ज्याचं स्वप्न अनेक मुली पाहतात. तिचं आयुष्य हे दाखवतं की महिलांसाठी स्वातंत्र्य, विशेषतः आर्थिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे. पैशांविषयी करीना कपूरचं बदललेलं मत अलीकडेच करीना दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिने सांगितलं की गेल्या काही वर्षांत तिचा पैशांविषयीचा दृष्टिकोन कसा बदलला आहे. ती म्हणाली, “माझं पैशांविषयीचं मत बदललं आहे. मागील २६ वर्षांच्या कामानंतर मला पैशांकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलल्यासारखा वाटतो.” अभिनेत्रींचं समान वेतन मागणं योग्य करीनाने पुढे सांगितलं, “आजच्या काळात अभिनेत्री देखील आपल्या पुरुष सहकलाकारांइतकं वेतन मिळावं, असं ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे महिलांनाही पैशांविषयी नवा दृष्टिकोन मिळाला आहे.आज पैसा म्हणजे फक्त बँकेत ठेवलेला आकडा नाही, तर त्याचा अर्थ वेगळा आहे. आत्मनिर्भरतेचा आणि सन्मानाचा.” लग्नानंतरही अभिनयात स्वातंत्र्य ‘जब वी मेट’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या करीना कपूरने सांगितलं की, सैफ अली खानशी लग्न झाल्यानंतरही तिने कधीच आपल्या अभिनयाच्या स्वातंत्र्यावर तडजोड केली नाही. ती म्हणाली, “जीवनाचे अनुभव कामातून, लग्नातून आणि जबाबदाऱ्यांमधून मिळतात. पण या सर्वांतून एक गोष्ट मला कायम वाटली, मी स्वतःची स्वतंत्रता राखली पाहिजे.मी नेहमीच एक अभिनेत्री म्हणून माझं स्वातंत्र्य टिकवून ठेवू इच्छित होते. अगदी सैफशी लग्न झाल्यानंतरही मी तेच केलं. मला माझ्या मेहनतीचे पैसे रोज अनुभवायचे आहेत.” करीना कपूरचा वर्कफ्रंट सध्या करीना कपूर दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपट ‘दायरा’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज सुकुमारन सोबत झळकणार आहे. करीना कपूर खानने आपल्या आयुष्यातील अनुभवातून हे दाखवून दिलं आहे की लग्नानंतरही महिलांनी स्वतःचं करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्य टिकवणं तितकंच आवश्यक आहे.