“सैफला गंभीर दुखापत झाली असून…” ; पतीवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली भावुक प्रतिक्रिया

Kareena Kapoor । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीज नाही तर सर्व क्षेत्रात एकाच गोंधळ उडाला आहे. रात्री अडीचच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सैफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खानकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“सैफला गंभीर दुखापत झाली असून…” Kareena Kapoor ।
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूर खानच्या टीमने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. निवेदनात “रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो, तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत. काळजीबद्दल सर्वांचे आभार,” असे म्हटले आहे.
सैफवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया Kareena Kapoor ।
दरम्यान, हल्ल्यानंतर सैफ अली खानला पहाटे ३.३० वाजता लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात त्याला सहा जखमा झाल्या, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सैफवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो रिकव्हरी रूममध्ये असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान , गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यात सैफच्या कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. सध्या मुंबई पोलीस वेगाने या प्रकरणाचा तपास करत असून सैफ अली खानच्या घरी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. सैफ व करीनाच्या घराजवळचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.





