कराडचे कोयनेश्वर मंदिर पाण्यात; जनजीवन विस्कळीत

कराड : शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. तर कोयनेसह कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नदीकाठावरील बहुतांश शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. कराड शहरात कोयनेश्वर मंदिरात पाणी शिरले असून प्रीतीसंगमावरही प्राचीन मंदिराच्या पायर्यांवर पाणी आले आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पावसाला शनिवारपासून पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला. सोमवारी आणि मंगळवारी जास्त पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिले. परिणामी त्याचा मोठा फटका पिकांना बसणार आहे.
शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडणार आहेत. तसेच मुळ्या कुजून पीक वाया जाण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त केली जात आहे. गत दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह वांग, उत्तरमांड, दक्षिण मांड या उपनद्यांची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीकाठची शेतजमीन वाहून गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कराड शहरातील कोयनेश्वर मंदिर पाण्यात गेले आहे. याठिकाणी चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. ओढ्याच्या पाण्यालाही फुगवटा राहिल्यामुळे हे पाणी नजीकच्या लोकवस्तीत जाण्याची शक्यता आहे.
प्रीतीसंगम घाटावरील प्राचीन मंदिराच्या पायर्यांवर पाणी आले आहे. याठिकाणी कृष्णा कोयना संगमावर नदीपात्राचे अक्राळविक्राळ रूप पाहयला मिळत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.





