कराड उत्तरची लढत हाय व्होल्टेजची ठरणार

संदीप मोरे
रहिमतपूर,- जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील मयांच्याविरोधात महायुतीमधून मनोज घोरपडे यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली असून अर्ज भरण्याच्या रॅलीत मनोज घोरपडे यांच्यासमवेत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी हजेरी लावल्यामुळे महायुतीमधील बंड शमले आहे.
या मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच होता. धैर्यशील कदम, मनोज घोरपडे ,रामकृष्ण वेताळ यांनी उमेदवारीसाठी चंग बांधला असतानाच उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनीही दंड थोपटले होते .परंतु, घोरपडे यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली. आता आमदार बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. यामुळे कराड उत्तरची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असून या निवडणुकीत बाजी मारणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे.
या मतदारसंघावर गेली पाच टर्म आमदार बाळासाहेब पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. पाटील यांनी शरद पवार यांची नेहमी पाठराखण केली आहे. 2009 मध्ये बाळासाहेब पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर अपक्ष उमेदवारी मिळवून ते विजयी झाले होते. यानंतरच्या सलग दोन निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासमोर मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी चांगले आव्हान उभे केले होते.
परंतु, मतविभागणीचा फायदा घेत बाळासाहेब पाटील निवडून आले होते. आता या निवडणुकीत मतविभागणी टाळली व एकच उमेदवार दिला तर निकाल काहीही लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे एकच उमेदवार देण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार गटात राहणे पसंत केले.त्यामुळे येथील उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जाहीर होते. परंतु महायुतीमध्ये जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी तयारी करत पक्षश्रेष्ठींकडे जोरदारपणे उमेदवारीची मागणी केली होती.
अखेर उमेदवारी मिळवण्यामध्ये मनोज घोरपडे सरस ठरले. अशा वेळी मतदारसंघात वेगळी भूमिका घेतली जाते का, याची चर्चा मतदारसंघात होती . परंतु अर्ज भरण्यावेळी मनोज घोरपडे यांच्या रॅलीत रामकृष्ण वेताळ व धैर्यशील कदम उपस्थित राहिल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर होऊन घोरपडे यांना बळ मिळून लढत अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.
विद्यमानांपुढे मोठे आव्हान
लोकसभा निवडणुकीत कराड उत्तरमधून खासदार उदयनराजे भोसले यांना मिळालेली मते व मनोज घोरपडे यांनी केलेले काम पाहून उदयनराजे तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीला प्रथमपासूनच हिरवा कंदील होता. सातारा तालुक्यात खासदार व आमदारा गटाची पूर्ण ताकद मनोज घोरपडे यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे. ही एकत्रित ताकद आमदार बाळासाहेब पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करू शकते .





