Karad Crime : पंधरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार! ‘लग्न करायचंय’ म्हणत धमकावत होता ; युवकावर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
कराड – पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विवाहासाठी तिला दमदाटी करणार्या युवकावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना संशयित युवकाने तिला त्याच्या घरी बोलावून घेतले. घरात त्याने तिच्यावर अत्याचार केला. जुलै 2025 महिन्यात हा प्रकार घडला. त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा पीडित मुलीला विवाहासाठी धमकावले.
‘मला तू आवडतेस. तुझ्याशी लग्न करायचे आहे,’ असे म्हणून तो मुलीला ठार मारण्याची धमकी देत होता. युवकाच्या त्रासामुळे घाबरलेली मुलगी शाळेतही जात नव्हती. याबाबत आईने मुलीकडे विचारणा केली असता तिने जुलै महिन्यात घडलेल्या प्रकार आणि संबंधित युवक देत असलेल्या धमकीबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसमवेत पीडित मुलीने याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




