Karad Crime| कराडमध्ये बनावट दारूचा भांडाफोड ; अपार्टमेंटमध्ये तयार होत होती रसायनमिश्रित दारू

प्रभात वृत्तसेवा
कराड – सैदापूर, ता. कराड येथील जिव्हाळा ढाब्यासमोरच्या अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर बुधवारी (दि. 10) सायंकाळी छापा टाकून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल आणि बनावट दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.मयूर कृष्णदेव कदम, मंदार कृष्णदेव कदम (रा. करवडी, ता. कराड) आणि विजय शिवाजी निगडे (रा. शिरवळ, ता. कराड) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, सैदापूर येथील जिव्हाळा ढाब्यासमोरच्या एका अपार्टमेंटमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे बुधवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीररीत्या दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या दोन कारमध्ये दारूने भरलेले कॅन होते. तेथे थांबलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, चौकशी केली असता, रसायनमिश्रीत बनावट दारू तयार करत असल्याचे तिघांनी कबूल केले.
पोलिसांनी दहा लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन कार, 10 हजार 500 रुपये किमतीचे 210 लिटर स्पिरिट, एक हजार 700 रुपये किमतीचे इसेन्स, दीड हजार रुपये किमतीचे फिल्टर, दोन हजार रुपयांची पाण्याची टाकी आणि बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे यांनी फिर्याद दिली आहे.



