Kapil Sibal : ‘निवडणूक आयोगाने इव्हीएमवर स्पष्टीकरण द्यावे’ – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – कॉंग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयी (इव्हीएम) काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी मांडली.
नुकत्याच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणूक निकालावरून इव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या निवडणुकीत विजय मिळवून भाजपने हरियाणाची सत्ता राखली.
मात्र, कॉंग्रेसने तो निकाल अमान्य केला. इव्हीएमशी संबंधित काही विसंगती त्या पक्षाने निवडणूक आयोगापुढे मांडल्या. कॉंग्रेसने २० मतदारसंघांमधील आपल्या उमेदवारांच्या लेखी तक्रारी आयोगाकडे दाखल केल्या.
मतमोजणीच्या दिवशी (८ ऑक्टोबर) काही इव्हीएमच्या बॅटरी अधिक प्रमाणात म्हणजे ९९ टक्क्यांपर्यंत चार्ज होत्या, असा आरोप त्या तक्रारींद्वारे करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर, सिब्बल यांना पत्रकारांनी कॉंग्रेसच्या आरोपाशी संबंधित प्रश्न विचारला.
त्यावर ते उत्तरले, इव्हीएमविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कॉंग्रेसकडून निवडणूक आयोगाला पुरावे उपलब्ध केले जात आहेत. मला त्याविषयी अधिक माहिती नाही. पण, आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे. इव्हीएमचा गैरवापर होतो असे मला वाटते.
अर्थात, तो किती प्रमाणात होतो; ते मला ठाऊक नाही. मी सुरूवातीपासूनच इव्हीएमला विरोध दर्शवत आलो आहे. पारदर्शक नसलेले स्वीकारले जाऊ नये, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.





