The Great Indian Kapil Show: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या वर्षातील आगामी चित्रपट आणि मालिकांची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली क्राईम सीझन 3 पासून ते कोहरा सीझन 2 पर्यंत अनेक मालिकांचा समावेश आहे. यासोबतच, नेटफ्लिक्सने द ग्रेट इंडियन कपिल शो च्या तिसऱ्या सीझनची देखील घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शो च्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाले होते. त्यानंतर आता सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्माने दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्येच तिसऱ्या सीझनसह पुन्हा नेटफ्लिक्सवर परतणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता नेटफ्लिक्स इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा करत सोशल मीडियावर याचा एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. व्हीडिओ शेअर करत नेटफ्लिक्सने लिहिले की, ‘भरपूर हास्य आणि मोठ्या कलाकारांसह आता 2025 चा फनीवार होईल धमाकेदार, द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३ लवकरच परत येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर.’ या कार्यक्रमाबाबत बोलताना कपिल म्हणाला की, ‘आम्हाला तर वाटतं की हा शो संपूर्ण वर्षभर सुरू राहावा. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण कोल्डप्लेसाठी लोक तिकिट खरेदी करत होते आणि त्यांनी ईमेल करत आम्ही कार्यक्रमात येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले. त्यांना आम्ही म्हणालो, आम्ही बोलवू; पण सध्या आपला शो सुरूच नाहीये. त्यामुळे नेटफ्लिक्सला विनंती आहे की हा कार्यक्रम सतत सुरू ठेवावा.’ ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3 मध्ये यावेळी अर्चना पूरण सिंग जजच्या खुर्चीवर दिसतील. सोबतच, कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि राजीव ठाकूर हेही प्रेक्षकांना हसवताना दिसतील. मात्र, नेटफ्लिक्सने तिसरा सीझन कधीपासून सुरू होणार याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.