Kapil Dev On R Ashwin’s Retirement : रविचंद्रन अश्विन योग्य सन्मानास पात्र होता – कपिल देव

Kapil Dev reacts to R Ashwin’s retirement – बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने घेतलेल्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. भारताला पाहिला विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या कपिल देव देखील धक्का बसलेल्यामध्ये समावेश आहे. भारताच्या दिग्गज खेळाडू असलेल्या अश्विनने खेळ सोडण्याचा निर्णय तडकाफडकी कसा घेतला याचे मला आश्चर्य वाटले. चाहते निराश झाले आहेत, पण मला त्याच्या चेहऱ्यावरही निराशा दिसली. तो दुःखी आहे. यापेक्षा तो चांगला निरोप घेण्यास पात्र असल्याचे कपिल देव यांनी म्हटले आहे.
कपिल देव पुढे म्हणाले की, मालिका संपेपर्यंत थांबून तो भारतीय भूमीवर निवृत्ती जाहीर करू शकला असता. मात्र त्याने असे का केले हे मला माहीत नाही. मला त्यांची बाजूही ऐकायची आहे. तो नक्कीच आदरास पात्र आहे. त्याने देशासाठी १०६ कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अमूल्य योगदानाची बरोबरी कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. असे ते म्हणाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अश्विनच्या भव्य निरोपासाठी योग्य व्यवस्था करेल, अशी आशा त्यांनी बोलताना व्यक्त केली.
त्याच्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले असते…
अश्विन एक लढाऊ वृत्तीचा क्रिकेटपटू होता. त्यामुळेच त्याने अनेकदा भारताला संकाटातून आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बाहेर काढले आहे. त्याने कधीही हार मानली नाही. त्यामुळेच तो भारताकडून सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळविणारा खेळाडू ठरला. मी देवाचे आभार मानतो, की अश्विन माझ्या काळात क्रिकेट खेळत नव्हता. तो माझ्या काळात खेळत असता, तर नक्कीच त्याच्यामुळे मला संघातील स्थान गमवावे लागले असते, असे बोलताना कपिल देव म्हणाले.
प्रयोगशील असलेला अश्विन
अश्विन एक अनुभवी, अष्टपैलू आणि अपारंपरिक गोलंदाज होता ज्याने त्याच्या वेगवान आणि हुशार लाईन आणि लेंथच्या फरकाने फलंदाजांना सतत त्रास दिला. कपिल म्हणाले की, तो नेहमी प्रयोग करण्यास तयार होता आणि यामुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरला. ज्या खेळात फलंदाजांची अधिक प्रशंसा केली जाते, अश्विनने स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. त्याच्यामध्ये असलेल्या धाडसामुळेच तो सामन्यात कधीही गोलंदाजी करू शकत होता.





