“इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा ‘इमर्जन्सी’ चित्रपट…”; ‘सामना’तून कंगणावर हल्लाबोल

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’च्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. पंतप्रधान इंदिरा गांधींवर आधारित असलेल्या चित्रपटावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोकमधून टीका करण्यात आली आहे. कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला आणि बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहे. ‘सामना’मधील आपल्या ‘रोखठोक’ सदरामधून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
‘सामना’मधील ‘रोखठोक’मध्ये काय लिहिले ?
“कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर असल्याने त्यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. ज्यांनी देशाच्या जडणघडणीत काहीच योगदान दिले नाही, असे आजचे सत्ताधीश व त्यांचे आंधळे अनुयायी हे सर्व करत आहेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी. आणीबाणीच्या अंमलबजावणीत काही अतिरेक झाले असतील. असा अतिरेक सध्या रोजच होत आहे व इतिहास भविष्यात त्याचेही मूल्यमापन करणारच आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी तर ‘बॉम्ब’ बनविण्याचा कारखानाच काढला होता. आज पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जाते. हे आणीबाणीचेच नवे रूप आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
अदानींवर घणाघात
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय? इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट व निर्मात्यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा. इंदिराजींचे नेतृत्व कणखर व पोलादी होते. देशातील आधारभूत परिवर्तनाच्या त्या नायिका होत्या. आजचा विकास म्हणजे इंदिराजींनी केलेल्या पायाभरणीचे फळ आहे. गौतम अदानी यांना तर महाराजाचा दर्जा मिळाला आहे. असे अनेक महाराज आणीबाणीत तुरंगात जाऊन पडले होते व त्यामुळे लोक खूश होते”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
“राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौमत्वेला धोका निर्माण झाला हे पटताच त्यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे, सैन्य घुसवून भिंद्रनवाले व त्यांच्या अतिरेकी फौजांना खतम केले. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही व शेवटी याच कारवाईची किंमत चुकवत पंतप्रधानपदी असताना त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. शीख समाज आपल्या विरोधात गेलाय हे माहीत असतानाही त्यांनी आपले शीख अंगरक्षक बदलले नाहीत. काय हे धैर्य! मणिपूरच्या हिंसाचाराला व मनुष्यसंहाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे अनुयायी आज इंदिरा गांधी यांच्यावर चिखल उडवीत आहेत,” असा टोला राऊत यांनी कंगनाला लगावला आहे.





