कंगनाचा ‘इमर्जन्सी’ सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार; ‘या’ तारखेला ओटीटीवर होणार रिलीज

Emergency OTT Release | बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. 17 जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. पॉलिटिकल ड्रामा असल्याने या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली, मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमा फ्लॉप ठरला. आता हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. स्वतः कंगनाने याबाबत माहिती दिली आहे.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीच्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. या सिनेमात कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तिनेच केले आहे. आता अभिनेत्रीने चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट 17 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘इमर्जन्सी’च्या ऑनलाइन स्ट्रीमिंगची तारीख शेअर केली आहे. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘17 मार्च रोजी ‘इमर्जन्सी’ नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.’
दरम्यान, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 21 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर, आता प्रेक्षकांना चित्रपट घरी बसून पाहता येणार आहे. या चित्रपटात कंगनासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाख नायर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे.





