Kanersar Pabal Road: खड्ड्यांनी नागरिक बेजार! कनेरसर-पाबळ रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव, काय झाला निर्णय?
Kanersar Pabal Road: कनेरसर-पाबळ रस्त्याची अत्यंत दुरवस्था; कायमस्वरूपी कामासाठी श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची आमदार बाबाजी काळे यांची मागणी.

Kanersar Pabal Road – कनेरसर-पाबळ मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे कायमस्वरूपी काम श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी दिली.
टाव्हरे यांनी सांगितले की, कनेरसर-पाबळ मार्ग पूर्णपणे उखडला असून काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले खड्डेही पावसामुळे पुन्हा उघडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात कनेरसर आणि पाबळ येथील नागरिकांनी आंदोलनही केले आहे. या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव मंत्रालयात दाखल असला,
तरी निधीअभावी त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. स्थानिक नागरिकांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आमदार बाबाजी काळे यांच्याशी चर्चा केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणार्या भाविकांसाठी कनेरसर-पाबळ मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यामुळे या रस्त्याचा समावेश भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.





