“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” ; सावता महाराजांची पुण्यथिती वाल्ह्यात साजरी

वाल्हे : कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥
लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥
सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥
श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा 729 वा समाधी पुण्यतिथी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथील सावतामाळी मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. वाल्हे येथील संत सावतामाळी मंदिरामध्ये मागील 68 वर्षांपासून येथील सावतामाळी मंदिरामध्ये पुण्यतिथी साजरी केली जाते. दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येते.
महर्षि वाल्मिकींच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीमध्ये श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 3) सांगता समारंभ प्रसंगी सकाळी सावता महाराजांच्या पादुकांना व मूर्तीला अभंग दही दुधानी स्नान घालून अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. व पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीतून श्री संत सावता महाराज प्रतिमेची रंगीबेरंगी फुगे- फुलांनी सजविलेल्या बैलगाडीतून ग्रामप्रदर्शना करण्यात आली.
यावेळी, टाळ-मृदंगाच्या तालावर सावता महाराज की जय; ज्ञानोबा तुकारामचा जयजय घोषणेमध्ये वाल्हे परिसर दुमदुमून गेला होता. अभंग घेत प्रदक्षिणा मारून मिरवणूक श्री संत सावता माळी मंदिरामध्ये आली.यानंतर दिलीप महाराज झगडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन, महाप्रसादाने वाटप होणार आहे.
यानंतर, समाज बांधवांच्या वतीने व रवींद्र धर्माजी भुजबळ यांच्या वतीने, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वाल्हे जवळील कामठवाडी, तसेच पिसुर्टी येथेही श्री संत सावता महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





