Kanchan Waterfall : जुन्नरच्या आंबे-हातवीज येथील कांचन धबधबा; निसर्गसौंदर्याची भुरळ, पण सुविधांची दुरवस्था!

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी परिसर हा हिरव्या निसर्गाने नटलेला आहे. येथील आंबे आणि हातवीज गावांजवळील काचन ऊर्फ कांचन धबधबा आणि त्याचा अलौकिक निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे.
जुन्नर शहरापासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबे आणि हातवीज या गावांपर्यंत जाणारा मार्ग हिरवाईने नटलेला आहे. या मार्गावर छोटे-मोठे धबधबे, तुडुंब भरलेली भातखाचरे आणि डोंगरांवर पसरलेली धुक्याची चादर पर्यटकांना मोहित करते. हातवीज येथील टेकडीवर वसलेल्या दुर्गादेवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक कोकणकडा आणि जवळच असलेला पाझर तलाव पाहू शकतात.
दुर्गादेवी मंदिरापासून परतताना उजव्या वळणावर, हातवीज गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ज्योती हॉटेलपासून सुमारे दोन किलोमीटर पायी खाली उतरल्यास कांचन धबधबा लागतो. गावातूनही या धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पूर्वी अपरिचित असलेला हा धबधबा आता पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला असून, येथे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
सुविधांची दुरवस्था, पर्यटकांची नाराजी
दुर्गादेवी मंदिर परिसरात वन विभागाने काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी उभारलेली वेटिंग शेड्स आणि बाकड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही शेड्सचे पत्रे वाऱ्याने उडून गेले असून, शासनाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या सुविधांचा फारसा उपयोग होत नसल्याची खंत पर्यटक व्यक्त करत आहेत. यामुळे प्रशासनाने या सुविधांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.





