Kamshet News | शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! ; ग्रामसभेतच अंगावर ओतलं रॉकेल

प्रभात वृत्तसेवा
कामशेत – ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून एका संतप्त नागरिकाने भर ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सभागृहात प्रचंड खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी (दि. ८) आयोजित ग्रामसभेत ही धक्कादायक घटना घडली. कामशेत येथील रहिवासी रामचंद्र धावडे यांच्या शेतामध्ये गेली चार वर्षे सांडपाणी साचत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत होते.
पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरणे, बेडूक, विंचू व साप घुसणे असे प्रकार वारंवार होत होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने दिली, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.या कायमस्वरूपी दुर्लक्षाला कंटाळून धावडे यांनी भर सभेत अंगावर रॉकेल ओतले. प्रसंगावधान राखत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना वेळीच रोखले आणि मोठा अनर्थ टळला.
ग्रामस्थांनी या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत चौकशीची मागणी केली. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांकडेही सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला. या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न ग्रामविकास अधिकारी धनंजय देशमुख यांच्याशी करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
“शेतामध्ये चार वर्षांपासून सांडपाणी येत होते, त्यामुळे घरामध्ये पावसाचे पाणी येऊन विंचू, साप येण्याचे प्रकार घडत होते. आम्ही चार वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांना पत्रव्यवहार केले, परंतु ग्रामपंचायत प्रशासन उडवा उडवीची उत्तरे ते कोणती कार्यवाही करत नव्हते.”
– रामचंद्र धावडे, स्थानिक नागरिक





