Kamshet : आयात उमेदवारामुळे असंतोषाची ठिणगी; जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

कामशेत – कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असंतोष जाणवत आहे. या गटासाठी आयात उमेदवाराला संधी देण्याच्या निर्णयामुळे अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. संघटना उभी करण्यासाठी पायपीट करणारे आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणारे स्थानिक कार्यकर्ते या निर्णयामुळे स्वतःला दुर्लक्षित केल्याचे समजत आहेत.
पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना वाटते की, निर्णायक क्षणी पक्षाने त्यांच्यावर विश्वास न दाखवणे हा त्यांच्या पक्षासाठी असलेल्या एकनिष्ठतेची अवहेलना करणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी आम्ही काम करत आलो आहेत. प्रत्येक निवडणुकीत बूथवर रात्र जागून लक्ष ठेवले, गावागावांत गट-तळपातळीवर प्रमाणिकपणे काम केले, पण उमेदवारी मात्र बाहेरून आलेल्या लोकांना दिली जाते, अशी खंत कार्यकर्त्यांमध्ये पसरत आहे. या विधानांमधून निष्ठावान कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान भाजपसमोर उभे ठाकले आहे.
पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक नेतृत्वांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त करण्याचे टाळले असले तरी सोशल मीडियावर नाराजी स्पष्टपणे दिसू लागली आहे. सोबतच स्थानिक गटांमधील चर्चांमधून देखील असंतोषाची ठिणगी पेट घेत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे की, आयात उमेदवाराला गटाचा इतिहास, समस्या आणि भूगोल याची स्पष्ट जाण नसल्याने निवडणुकीत परिणाम भोगावा लागू शकतो.
सर्वात मजबूत गटात तडे
कार्ला-खडकाळा गटात गेल्या अनेक वर्षांत भाजपने मजबूत संघटन उभारले आहे. ग्रामपातळीवर बूथ कमिटी, शक्ती केंद्र, मोर्चा, युवती आघाडी ते ज्येष्ठ कार्यकर्ते अशा सर्वांनी मिळून या गटात भाजपला मोठा आधार निर्माण केला आहे. त्यामुळे या गटातील मतसंख्या भाजपच्या बाजूने आहे, असे नेहमीच मानले जात होते. मात्र आयात उमेदवारामुळे या मतसंख्येत गोंधळ निर्माण होण्याची भीती स्थानिक नेतृत्वाकडून व्यक्त केली जात आहे.
आयात उमेदवाराच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
स्थानिकांच्या नाराजीतून, आयात उमेदवाराला खरोखरच स्थानिकांचा आधार लाभेल का, ज्यांच्या आधारावर निवडणूक उभी राहते, ते बूथवरील कार्यकर्तेच जर नाराज असतील, तर निवडणुकीत उमेदवार टिकेल कसा, असा महत्त्वपुर्ण प्रश्न सध्या विचारला जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी असेही सांगितले की, आयात उमेदवारंनी कितीही मोठ्या सभा घेतल्या, तरी स्थानिक चेहऱ्याशी असलेला संबंध ते जपतील का, असाही प्रश्न सध्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसमोर मत मांडले तरी ऐकून घेतले जात नाही, अशीही तक्रार सध्या केली जात आहे. संघटनेत मत व्यक्त करण्याचा अधिकार गमावल्याची भावना निर्माण होत असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
पुढील काही दिवस निर्णायक
येणाऱ्या काही दिवसात कार्यकर्त्यांमधील नाराजीचा कसा विस्तार होतो आणि पक्ष त्यावर काय उपाय काढतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेतला नाही, तर आयात उमेदवारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.





