BJP Candidate – जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःची उमेदवारी मागे घेतल्यानंतरही विरोधी उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला. उमेदवारी मागे घेतलेल्या व्यक्तीला याचिका दाखल करण्याचा अधिकार काय? असा थेट सवाल करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या पल्लवी काळे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दीपाली जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होते. मात्र, काळे यांनी नंतर आपला अर्ज मागे घेतला. तरीही त्यांनी जगदाळे यांच्या अर्जात मालमत्तेबाबत चुकीची माहिती दिल्याचा व सरपंचपदाचा तपशील दडविल्याचा आरोप करत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तातडीच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत, याचिकाकर्त्याने उमेदवारीच मागे घेतली असताना न्यायालयाचा वेळ वाया का घालवला? असा सवाल केला. वकिलांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने याचिका फेटाळत दंड ठोठावला. शेतकरी असल्याने दंड कमी करावा, ही विनंतीही न्यायालयाने नाकारली.