Kamshet Garbage Issue: कामशेतच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य! दुर्गंधी आणि मोकाट कुत्र्यांमुळे प्रवासी त्रस्त…कारवाई कधी होणार?
Kamshet Garbage Issue: पुणे-मुंबई महामार्ग, दौंडे कॉलनी फाटा व पवनानगर रोडवर उघड्यावर कचऱ्याचे ढीग; कुजलेल्या अन्नामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य.

Kamshet Garbage Issue- पुणे-मुंबई महामार्गालगत तसेच शहरातील विविध भागांत उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दौंडे कॉलनी फाटा, पवनानगर रोड परिसरासह महामार्गालगत कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. कुजलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दौंडे कॉलनी, पवनानगर रोड आणि पुणे-मुंबई महामार्गालगत अन्नपदार्थांचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. हॉटेलमधील उरलेले अन्न, चिकन दुकाने, चायनीज सेंटर तसेच ढाब्यांमधून निघणारा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दिवसेंदिवस त्याचे ढीग वाढत आहेत. त्यातच पावसामुळे ओला झालेला कचरा कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
उघड्यावर टाकलेल्या अन्नकचऱ्यावर भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कुत्री कचरा रस्त्यावर ओढून आणत असल्याने परिसरात आणखी अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे कचरा रस्त्याच्या कडेला तसेच आसपासच्या परिसरात विखुरला जात आहे. विशेषतः दौंडे कॉलनी फाटा आणि महामार्गालगतच्या भागात कुत्र्यांचा वावर वाढल्याने दुचाकीस्वारांसाठी धोका निर्माण झाला आहे. अन्नाच्या शोधात कुत्री अचानक रस्त्यावर येत असल्याने अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.
दिवसा उघड्यावर कचरा टाकला जात असतानाच रात्री या कचऱ्याला आग लावण्याचा प्रकारही सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. हा धूर महामार्गाच्या दिशेने पसरल्यास वाहनचालकांना समोरील रस्ता दिसण्यात अडचण निर्माण होऊ शकते. कचरा जाळल्यामुळे परिसरातील नागरिकांनाही धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे उघड्यावर कचरा टाकण्याबरोबरच कचरा जाळण्याच्या प्रकारावरही नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. महामार्गालगतचा परिसर हा शहराचा प्रवेशमार्ग असल्याने तेथे स्वच्छता राखणे आवश्यक आहे. कचरा टाकण्यासाठी निश्चित व्यवस्था, नियमित संकलन तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्यास समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
कारवाई केवळ कागदावरच?
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्षात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे बेजबाबदार नागरिक आणि व्यावसायिकांकडून कचरा टाकला जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. कचरा संकलनाची नियमित आणि प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे काही जण रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.






