Mohammad Rizwan : रिझवानचा ‘रिटायर्ड आऊट’वरून अपमान? कामरान अकमल संतापला; म्हणाला, ‘बीबीएल सोडून परत ये!’

Mohammad Rizwan Retired Out Controversy : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’मध्ये (BBL) खेळत आहे. मात्र, सिडनी थंडरविरुद्धच्या एका सामन्यात त्याला ज्या पद्धतीने ‘रिटायर्ड आऊट’ करण्यात आले, त्यावरून क्रिकेट विश्वात नवा वाद पेटला आहे. या घटनेवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकी घटना काय?
मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणाऱ्या रिझवानला सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात संथ फलंदाजी करणे महागात पडले. रिझवानने २३ चेंडूत केवळ २६ धावा केल्या होत्या. त्याची ही संथ गती पाहून रेनेगेड्सचा कर्णधार विल सदरलँड आणि टीम मॅनेजमेंटने त्याला मध्येच ‘रिटायर्ड आऊट’ करण्याचा निर्णय घेतला. रिझवानने मॅनेजमेंटचा शब्द मानला आणि तो तडक मैदाबाहेर गेला. मात्र, एका वरिष्ठ खेळाडूला अशा प्रकारे बाहेर बोलावणे हे पाकिस्तानी क्रिकेट समर्थकांना अपमानास्पद वाटले आहे.
कामरान अकमलचा संताप –
रिझवानच्या या ‘रिटायर्ड आऊट’मुळे त्याची सोशल मीडियावर मोठी खिल्ली उडवली जात आहे. यावर बोलताना कामरान अकमल म्हणाला की, “एका वरिष्ठ खेळाडूसोबत असे वर्तन होणे हे अत्यंत खेदजनक आहे. जर रिझवानचा असा अपमान होत असेल, तर त्याने ही लीग मधूनच सोडून पाकिस्तानात परत यायला हवे.” या घटनेमुळे रिझवानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याची भावना पाकिस्तानी क्रिकेट समुदायात आहे.
बीबीएलमध्ये रिझवानचा फ्लॉप शो –
बिग बॅश लीगच्या या मोसमात रिझवानला आपल्या नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याची आकडेवारी खूपच खराब राहिली आहे.
- एकूण डाव: ८
- एकूण धावा: १६७
- सरासरी: २०.८७
- स्ट्राइक रेट: १०१.८१
मोहम्मद रिझवानसारख्या टी-२० मधील दिग्गज खेळाडूचा स्ट्राईक रेट १०० च्या आसपास असणे, हे मेलबर्न रेनेगेड्ससाठी चिंतेचे कारण ठरले होते, ज्याचा परिणाम अखेर त्याच्या ‘रिटायर्ड आऊट’ होण्यावर झाला.





