भाषा न समजल्याने कमला हॅरिस यांची फजिती

नवी दिल्ली – अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती स्पॅनीश भाषेत गाणे म्हणताना दिसतो आहे. तर कमला ते ऐकताना टाळ्या वाजवत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. मात्र थोड्याच वेळात त्यांना समजते की गाणे म्हणणारी व्यक्ती प्रत्यक्षात त्यांचाच विरोध करते आहे. ते समजल्यावर कमला यांचे हास्य मावळते आणि टाळ्या थांबतात.
प्यूर्टो रिको येथील ही घटना आहे. सुरूवातीला कमला हॅरिस यांनी टाळ्या वाजवून गायकाला दाद दिली. त्यानंतर कोणीतरी त्यांना त्या गाण्याचा अर्थ सांगितल्यावर त्या एकदम शांत झाल्या. दरम्यान, कमला यांच्या प्यूर्टो रिकोच्या या यात्रेचे विरोध करूनच स्वागत करण्यात आले. त्यांचा ताफा ज्या मार्गावरून गेला त्या मार्गावर इस्त्रायलला समर्थन देत असल्याबद्दल अमेरिकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
निदर्शकांच्या हातातील काही फलकांवर कमला हॅरिस युध्द गुन्हेगार आहेत असा मजकुरही झळकवण्यात आला. एक जण स्पॅनिश भाषेत जे गाणे म्हणत होता त्यात पॅलेस्टीनी आणि हौती बंडखोरांच्या विरोधात केल्या जात असलेल्या हल्ल्यांना अमेरिकेचे जे सहकार्य आहे त्याचा निषेध करण्यात येत होता.
प्यूर्टो रिकोला अलिकडेच मारिया वादळाचा मोठा तडाखा बसला. त्यात प्रचंड विनाश झाला असून अमेरिकेने प्यूर्टो रिकोला १४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदत दिली आहे. त्या मदतीचा प्रचार आणि आढावा घेण्यासाठी कमला हॅरिस येथे आल्या होत्या.
वादळात तीन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून जगभरातून त्यांना मदत मिळाली आहे. मदत आणि बचाव कार्यात अमेरिकाच अग्रभागी होता. त्यानंतर कमला हॅरिस यांनी दौरा केल्यावर इस्त्रायल- हमास संघर्षावर त्यांना निदर्शनाचा सामना करावा लागला.





