Indapur : कामधेनू सेवा परिवाराचा भाऊबीज समारंभ उत्साहात
Indapur : कार्यक्रमाची सुरुवात शहीद राजाराम पोटफोडे यांचे वीरपिता लक्ष्मण केसु पोटफोडे (निमसाखर) यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदूरच्या होळकर घराण्याचे वंशज भुषणसिंहराजे होळकर यांनी भूषवले.

निमगाव केतकी : निराधारांचा आधार बनलेल्या कामधेनू सेवा परिवारच्या वतीने यंदाचा १८ वा भाऊबीज समारंभ शुक्रवारी (दि. ६) उत्साहात संपन्न झाला. अकलूज-इंदापूर रोडवरील शेटफळ पाटी येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील अकाली पतीचे छत्र हरपलेल्या निराधार भगिनी, आजी-माजी सैनिक, सी.आर.पी.एफ., एस.आर.पी.एफ. जवानांच्या पत्नी, माता तसेच वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. या सर्व भगिनींना व त्यांच्या मुला-मुलींच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश तेजोमय व्हावा, यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माहेरची एक प्रेमाची व मायेची भेट म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद राजाराम पोटफोडे यांचे वीरपिता लक्ष्मण केसु पोटफोडे (निमसाखर) यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदूरच्या होळकर घराण्याचे वंशज भुषणसिंहराजे होळकर यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि निरा-भिमा सह.सा.का.लि. शहाजीनगरच्या चेअरमन भाग्यश्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होत्या. तसेच कामधेनू सेवा पुरस्काराचे मानकरी म्हणून इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा माया मुकुंद विंचू यांना गौरविण्यात आले. ह.भ.प. विजयाताई विजयराव कोकाटे (लवंग, ता. माळशिरस) उपस्थिती होत्या.
सध्या ड्रग्सच्या विळख्याने केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण पिढीलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे यापुढे कामधेनू परिवाराने ग्रामीण भागातील तरुणांना ड्रग्समुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यापक स्वरूपात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
-हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री.
तुम्ही लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचे आणि सेवेचे काम करत आहात. यात आमचाही वाटा नक्कीच असावा. पुढच्या वेळेपासून या कार्यात आम्ही स्वतः प्रत्यक्ष सहभागी होऊ.
-भूषणसिंहराजे होळकर, वंशज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
एक हजार साड्यांचे वाटप
या दीपोत्सव सोहळ्यात अकाली वैधव्य आलेल्या महिलांना १ हजार साड्यांचे वाटप करण्यात आले, तर उपस्थितांमधील २५० मुलांना नवीन कपडे भेट देण्यात आले. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरच्या नात्याने मिळालेल्या या प्रेमामुळे अनेक भगिनींचे डोळे आनंदाने पाणावले होते.





