कल्याणचा शिंदेंनाच कौल ! डॉ. श्रीकांत शिंदे दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी; वैशाली दरेकरांचा दारूण पराभव

कल्याण – कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव करत त्यांनी कल्याणवरील आपली पकड मजबूत केली आहे.
मतमोजणी संपली तोपर्यंत श्रीकांत शिंदेंनी 2 लाख 40 हजार मतांनी आघाडी मिळवली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. कारण इथे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेत रणसंग्राम पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महिला नेतृत्वावर जबाबदारी सोपवली.
परंतू, महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. भाजप नेत्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांच्याविरोधत शिवसेना तगडा उमेदवार देईल, अशी आशा असताना ठाकरे गटाने वैशाली दरेकर या नवख्या नेतृत्वाला संधी दिली.
त्यामुळे श्रीकांत शिंदेंचा विजय सोप झाल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघातील अपुरी कामे, महायुतीतील अंतर्गत वाद याशिवाय कळवा-मुंब्रामधून होणारा विरोध, हे सर्व चित्र पाहता ही निवडणूक जिंकणं श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आव्हान असल्याचे म्हटले जात असताना, त्यांनी आता एकतर्फी विजय मिळवला आहे.
कल्याण लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी 2019 मध्ये सलग दुसर्यांदा विजयी मिळवला होता. श्रीकांत शिंदे यांनी 5,59,723 मते मिळवून विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना 2,15,380 मते मिळाली होती. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांनी 65,572 मते मिळवली होती.





