कल्याणीनगर अपघात प्रकरणी रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण; आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करून कालबद्ध कार्यक्रम (टाईम बाॅंड प्रोग्राम) निश्चित करावा, असे अर्जात नमूद आहे. या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हा अर्ज केला आहे.
मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, आई शिवानी विशाल अग्रवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) यांच्यावर खटला सुरू करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.
तर आशिष मित्तलला रक्त देण्यास सांगणाऱ्या अरुणकुमार देवनाथ सिंग यांच्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.
मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ३१ जानेवारीला
कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर ३१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यासह पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाखल केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.





