कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदावर असलेल्या डाॅ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मात्र, जाखड यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या महापालिका आयुक्तपदावर नव्या नियुक्तीची घोषणा राज्यसरकार स्तरावरून झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन बड्या नेत्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या शहरामध्ये अजूनही कायमस्वरूपी आयुक्त मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या शहरामध्ये शिंदे सेना आणि भाजपमधील संघर्ष यापूर्वीही लपून राहिलेला नाही. या संघर्षातून ही नियुक्ती रखडली आहे का अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे. आतापर्यंत पद रिक्त झालेल्या प्रत्येक महापालिकेत राज्य शासनाकडून तात्काळ आयुक्तांची नेमणुक करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त नेमणुकीसाठी शासन वेळकाढुपणा का करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे आल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेवर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा राहिला आहे. शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत कल्याण डोंबिवली महापालिकेत तीन आयुक्तांची नेमणूक करण्यात आली होती. पहिल्या दोन नियुक्तींनंतर मात्र, कुठेही चर्चेत नसलेल्या डाॅ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती अनेकांना चकीत करणारी होती. थेट सनदी सेवेतील डाॅ. जाखड या कडव्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मागील एक सव्वा वर्षांत त्यांनी महापालिकेच्या कारभारावर पकड देखील मिळविली होती. मात्र, त्यांची नेमणूक पालघरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आल्याने पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपद रिक्त राहिले आहे. नियुक्तीसाठी वेळखाऊपणा का? बेकायदा बांधकामे, वाढते फेरीवाले, वाहतुक कोंडी या तीन महत्वाची आव्हाने या पालिका क्षेत्रात आहेत. या ठिकाणी राजकीय वरचष्मा राखायचा असेल तर आयुक्त आपलाच हवा असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा एकंदरीत कारभार पाहता या ठिकाणी थेट सनदी सेवेतील अधिकारी यायला फारसे इच्छूक नाही, असेही चित्र आहे. युतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका महत्त्वाची राहिली आहे. या भागातील चारही आमदार या दोन पक्षाचे आहेत. असे असतानाही येथे महापालिका आयुक्त नेमताना वेळकाढूपणा का केला जात आहे असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.