कल्याण मारहाण प्रकरणी दुसरी बाजू आली समोर, अटकेपूर्वी शुक्ला यांनी दिले स्पष्टीकरण

Kalyan Crime News: कल्याण येथील योगीधाम परिसरातील आजमेरा सोसायटीत हिंदी भाषिक व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत आरोपी अखिलेश शुक्ला यांच्यासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी अखिलेश शुक्ला यांनी व्हीडिओ शेअर करत त्यांची बाजू मांडली होती.
सर्वातआधी देशमुख यांनी आपल्या पत्नीला शिवीगाळ करत केस ओढले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे अखिलेश शुक्ला व्हीडिओमध्ये म्हणाले. शू रॅक सरकवल्यामुळे देशमुख आणि कविळकट्टे कुटुंबाला याचा राग आला. व त्यांनी वाद घातला. शूरॅक आधीच्याच ठिकाणी ठेवा नाहीतर आम्ही तो तोडून फेकून देऊ’ असं ते म्हणाले. ते रोज मला व माझ्या पत्नीला त्रास देत होते, असे म्हणत शुक्ला यांनी आपली बाजू मांडली आहे.
मारहाण प्रकरणाबाबत बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, ‘त्यांनी धूप लावू नका नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. तसेच, बायकोला शिवीगाळ गेली. कानाखाली मारली.’
‘देशमुख कुटुंब एक वर्षापासून त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत मराठी बांधवांनीच मला सहकार्य केलं आणि वाचवलं. गेल्या पाच पिढ्यांपासून आम्ही महाराष्ट्रात राहतो आहोत. आम्हाला १०० वर्षं झाली. देशमुख कुटुंबानं माझ्या बायकोला मारलं, शिवीगाळ केली. आम्ही जे केलं, ते माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी केलं. त्यानंतर या लोकांनी त्याला परप्रांतीय वगैरे म्हणून विषय भलतीकडे नेला. मीही महाराष्ट्रीयन आहे. आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं,’ असे शुक्ला यांनी व्हीडिओमध्ये म्हटले आहे.
नेमका वाद काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत अखिलेश गुप्ता व अभिजित देशमुख हे दोघेही राहतात. अखिलेश यांच्या पत्नी देवपूजा केल्यानंतर धूप लावतात. धूपाचा धूर घरात जात असून, यामुळे त्रास होत असल्याचे सोसायटीतील वर्षा कळवीकट्टे यांनी अखिलेश यांच्या पत्नीला सांगितले. मात्र, याचे रुपांतर वादात झाले.
यावेळी याच सोसायटीत राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अखिलेश यांनी 7-8 जणांना बोलवून अभिजित देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत. या प्रकरणात दोन्ही पक्षाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता अखिलेश शुक्ला यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मनसे व शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.





