Kalki 2898 AD Sequel: ‘कल्की 2’ मध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा? मेकर्सच्या शांततेमुळे चर्चांना उधाण

Kalki 2898 AD Sequel: प्रभासच्या ब्लॉकबस्टर साय-फाय चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ च्या पुढील भागाबाबत चर्चांना वेग आला आहे. विशेषतः, दीपिका पादुकोण या सीक्वलचा भाग राहणार नाही, हे समोर आल्यानंतर अनेक अंदाज रंगू लागले आहेत. मेकर्सनी सप्टेंबरमध्ये एका पोस्टद्वारे दीपिकासोबत ते पुढे काम करणार नसल्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, त्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.
दीपिका का बाहेर पडली?
काही माध्यमांच्या अहवालांनुसार, दीपिकाने आपल्या शूटिंगच्या तासांवर फक्त 8 तासांची मर्यादा ठेवण्याची अट घातली होती. ही अट निर्मात्यांना मान्य न झाल्याने त्यांनी दीपिकापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आता दीपिकाच्या जागी कोण?
दीपिका पादुकोण सीक्वलमध्ये नसल्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, तिच्या भूमिकेसाठी आता कोणाला घेण्यात येईल? आधी साई पल्लवी आणि अनुष्का शेट्टी यांची नावे समोर आली होती. पण आता सोशल मीडियावर आणि अनेक अहवालांमध्ये प्रियंका चोप्राचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
सोशल मीडियावर सुरू चर्चांचा भडिमार
ग्लोबल स्टार बनलेल्या प्रियंका चोप्राने ‘फॅशन’, ‘मर्ज़ी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अॅक्शन आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे अनेक चाहते तिला ‘कल्की 2’ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, अद्याप मेकर्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
एका युजरने विनोदाने लिहिले, “काशीबाई अखेर मस्तानीवर मात करणार!” तर दुसऱ्या युजरने म्हटले, “ही खूप मोठी अपग्रेड कास्टिंग ठरेल.” काहींनी मात्र कथेतून दीपिकाच्या कॅरेक्टरची एग्झिट कशी दाखवली जाईल यावर प्रश्न उपस्थित केले. प्रेक्षकांच्या मते, मेकर्स मृत्यू, गायब होणे किंवा टाइमलाइनमध्ये बदल अशा प्लॉटचा आधार घेऊ शकतात.
मेकर्सचे अधिकृत विधान
सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या निवेदनात निर्मात्यांनी म्हटले होते, “दीर्घ चर्चेनंतर आम्ही ‘कल्की 2898 एडी’ च्या सीक्वलसाठी दीपिका पादुकोणसोबत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी आम्ही शुभेच्छा देतो.”
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2’ हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या चित्रपटाच्या कास्टिंग आणि प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. चाहते आता पुढील अधिकृत अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत.





