Kajol: बॉलिवूड अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिने आपल्या नव्या सेलिब्रिटी चॅट शो ‘Too Much With Kajol and Twinkle’ मध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. काजोलने म्हटले आहे की, “९ ते ५ नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा अभिनेते खूप जास्त मेहनत करतात.” तिच्या या विधानाला शोच्या सूत्रसंचालिका ट्विंकल खन्ना आणि पाहुणे वरुण धवन व आलिया भट्ट यांनी विरोध दर्शवला, परंतु काजोल आपल्या मतावर ठाम राहिली. “अभिनय म्हणजे पूर्णपणे सक्रिय काम” प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रसारित होत असलेल्या या शोमध्ये काजोलने आपले मत स्पष्ट करताना सांगितले की, “अभिनय हा खूपच अॅक्टिव्ह काम असतो. सेटवर असताना तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागतं.” तिने ‘The Trial’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं उदाहरण देत सांगितले की, तीने सलग ३५ ते ४० दिवस शूटिंग केलं होतं आणि दररोज लवकर उठून १२ ते १४ तास काम केलं होतं. “आमच्यासाठी दबाव खूप असतो” काजोल म्हणाली, “या काळात आम्हाला व्यायाम, आहार आणि शरीराची काळजी घ्यावी लागते. एका इंचानंही वजन वाढलं तर कपडे फिट होत नाहीत. आमच्यावर सतत दबाव असतो.” तिने सांगितले की, शूटिंग नसतानाही कार्यक्रम, जाहिराती आणि इव्हेंट्ससाठी सतत सक्रिय राहावे लागते. “डेस्क जॉबमध्ये मिळतो आराम” तुलनेसाठी काजोलने ९ ते ५ नोकरी करणाऱ्यांचा उल्लेख करत म्हटलं, “डेस्कवर बसून काम करणाऱ्यांना थोडा आराम मिळतो. ते चहा ब्रेक घेऊ शकतात, थोडं बोलू शकतात, चालू शकतात, आणि त्याचवेळी कामही करतात. पण आम्हाला ते शक्य नाही.” तिचा अर्थ असा होता की, अभिनयात शारीरिक आणि मानसिक सक्रियतेचा स्तर खूप जास्त असतो. सोशल मीडियावर टीकेचा भडका काजोलच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. युजर्स म्हणत आहेत की, “काजोलने इतर व्यावसायिकांच्या मेहनतीला कमी लेखल आहे.” त्यांच्या मते, डेस्क जॉब करणारे लोकही मोठ्या मानसिक ताणाखाली काम करतात, अनेकदा जास्त तास ऑफिसमध्ये राहतात, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा मोठा वाटा असतो. बर्याच जणांनी म्हटलं की, “प्रत्येक व्यवसायात वेगळ्या प्रकारचे आव्हानं असतात, त्यामुळे एकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवणं योग्य नाही.” एकूणच, काजोलच्या या विधानाने नव्या वादाला सुरुवात झाली असून, नेटिझन्सनी तिच्यावर “अवास्तव आणि असंवेदनशील” वक्तव्य केल्याची टीका केली आहे.