कैलाश गहलोत भाजपाला साथ देण्याची शक्यता; दिल्ली सरकारवर लावले होते गंभीर आरोप

Kailash Gehlot | आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्रीपदाचा आणि पक्षाचा राजीनामा रविवारी दिला. ‘आप’चा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले.
आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे नजफगडचे आमदार कैलाश गेहलोत आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12:30 वाजता कैलाश गेहलोत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती आता समोर येत आहे.
दरम्यान, कैलाश गेहलोत यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी पहिल्यांदा दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांना सलग तीन वेळा मंत्री करण्यात आले. राजीनामा देण्यापूर्वी कैलाश गेहलोत यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
गेहलोत यांचे ‘आप’वर गंभीर आरोप
केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात गेहलोत म्हणाले की, सध्या आम आदमी पार्टी गंभीर आव्हानांमधून जात आहे. पक्षातील राजकीय महत्त्वाकांक्षेने लोकांप्रती असलेली आमची बांधिलकी ढासळली आहे, अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत.
– जे पक्षाने दिल्लीतील जनतेला केले होते. यमुना स्वच्छ करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यमुना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. याशिवाय शीश महल (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) असे अनेक विचित्र वाद समोर आले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली. लोकांचा पक्षावर विश्वास आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी पक्ष केवळ त्यांच्या राजकीय अजेंडासाठी लढत आहेत.
– दिल्ली सरकार आपला बहुतांश वेळ केंद्राशी भांडण्यात घालवते त्यामुळे दिल्लीचा खरा विकास होऊ शकला नाही. दिल्लीतील लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता आणि तो पुढेही सुरू ठेवायचा आहे. त्यामुळेच मी ‘आप’पासून फारकत घेत आहे आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
यावेळी कैलाश गेहलोत यांनी केजरीवाल यांचे आभारही मानले आहेत. “अरविंद केजरीवाल जी, सर्वप्रथम मी एक आमदार म्हणून दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानू इच्छितो. आज आम आदमी पार्टीला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे आम्ही लोकांशी केलेली वचनबद्धता मागे टाकली आहे.
कैलाश गेहलोत पुढे लिहितात, “मी माझा राजकीय प्रवास दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने सुरू केला होता आणि मला तो पुढे चालू ठेवायचा आहे. त्यामुळेच माझ्याकडे ‘आप’शी फारकत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि म्हणूनच मी प्राथमिक पदाचा राजीनामा देत आहे,” असे गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा:
“जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस” ; कालिचरण महाराज यांचा घणाघात





