K.Kavitha : के. कविता यांचा आमदारकीचा राजीनामा; सख्ख्या भावाला दिला ‘हा’ सल्ला

हैदराबाद : भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी कालच त्यांच्या कन्या के. कविता यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी के कविता यांनी विधानसभा अध्यक्षांकडे विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्यानंतर, के कविता यांनी त्यांचे चुलत भाऊ टी हरीश राव यांच्यासह वरिष्ठ नेत्यांविरुद्ध टीकात्मक टिप्पणी केली तसेच त्यांचे सख्खे भाऊ आणि माजी मंत्री के टी रामा राव यांना वडिलांची आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती केली आहे.
पत्रकार परिषदेत कविता यांनी त्यांचे वडील आणि बीआरएस प्रमुख केसीआर यांचे प्रेरणास्थान म्हणून वर्णन केले आणि तेलंगणातील दलित आणि मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले. कविता यांनी पक्षातील कटाचा भाग म्हणून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. आपण रामण्णा यांना विनंती केली, पक्ष कार्यालयातून माझ्याविरुद्ध खोटा प्रचार पसरवला जात आहे.
जेव्हा माझ्या स्वतःच्या भावाकडून, कार्यकारी अध्यक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा मला परिस्थिती समजली, असे त्या म्हणाल्या. त्यांनी चुलत भाऊ हरीश राव यांच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत कट रचल्याचा आरोप केला आणि दावा केला की हरीश राव यांनी रेवंत यांचे दिल्ली दौऱ्यात पाय धरले तेव्हाच या कटाची बीजे पेरली गेली. हरीश राव आणि संतोष हे तुम्हाला नुकसान पोहोचवू इच्छितात आणि त्यांना बाजूला करूनच पक्ष टिकू शकेल. या कटांना बळी पडू नका, असा इशाराही कविता यांनी सख्खे भाऊ राम राव आणि त्यांच्या वडिलांना दिला.





