K. C. Venugopal : राहुल इंडिया आघाडीचा चेहरा असतील; के.सी.वेणुगोपाल यांनी केले स्पष्ट
K. C. Venugopal : पुढील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०२९) तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जावे, अशी मागणी त्यांच्या पक्षातून (टीव्हीके) पुढे येत आहे.

K. C. Venugopal : पुढील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०२९) तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जावे, अशी मागणी त्यांच्या पक्षातून (टीव्हीके) पुढे येत आहे. ती मागणी कॉंग्रेसच्या गोटातून अमान्य केली जात आहे.
मात्र, कॉंग्रेसच्या सर्वोच्च पातळीवरून प्रथमच त्या विषयावर भाष्य करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधकांच्या इंडिया आघाडीचा चेहरा असतील, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी केली.
तमिळनाडूतील टीव्हीकेचे नेते विजय यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. मात्र, त्याविषयी त्या राज्यातील कॉंग्रेस नेते सातत्याने असहमती दर्शवत आहेत. त्यांच्याकडून राहुल यांचे नाव लावून धरले जात आहे. इतर राज्यांतील कॉंग्रेस नेतेही त्या सुरात सूर मिसळत आहेत. तसे असले तरी अद्याप कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या स्तरावरून त्याविषयी थेट काही बोलणे टाळले जात होते.
मात्र, रविवारी केरळममध्ये पत्रकारांशी बोलताना वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी एकप्रकारे कॉंग्रेसची भूमिका मांडली. त्यांना विजय यांचे नाव प्रोजेक्ट केले जात असल्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. टीव्हीकेकडून विजय यांच्याविषयी औपचारिक मागणी झालेली नाही. कुठलाही संभ्रम निर्माण केला जाऊ नये. आगामी निवडणुकीत राहुल इंडिया आघाडीचे नेतृत्व करतील, असे उत्तर वेणुगोपाल यांनी दिले.
राहुल आज देशातील जनतेचे प्रेम मिळणारे सर्वांत प्रमुख नेते आहेत. त्यांचे म्हणणे प्रत्येकजण बारकाईने ऐकत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काही राज्यांत घटक पक्षांमध्ये मतभेद असले तरी इंडिया आघाडी मजबूत आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी (K. C. Venugopal) केले.






