Dhananjay Mahadik : कृष्णराज महाडिक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष; धनंजय महाडिक हे काय बोलून गेले? व्हिडिओ व्हायरल
Dhananjay Mahadik : आता कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या एका विधानामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरत आहेत.

Dhananjay Mahadik : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आरोप करत थेट राज ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन आणि घोषणाबाजी केल्याने भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक चर्चेत आले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत कानउघडणी केली होती. त्यानंतर आता कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या एका विधानामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरत आहेत.
काल गोपाळकाला निमित्ताने राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरमध्येही विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर युवाशक्ती दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी भाषण केले. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांनी कृष्णराज महाडिक यांचा भाजपऐवजी काँग्रेसचे नेते असा उल्लेख केला.
नेमकं काय घडलं?
भाषणादरम्यान धनंजय महाडिक म्हणाले, “आज कृष्णराज महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष… एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, विश्वास टाकला आहे.”
धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष असा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धनंजय महाडिक या वक्तव्याबाबत काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
दरम्यान, कृष्णराज महाडिक यांच्या राज ठाकरे यांच्या घराबाहेरील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “आमच्या पक्षातील जे तरुण आहेत, त्यांनी राग प्रकट केला. आमच्यातील जे प्रगल्भ आहेत, त्यांचं मत असं होतं की, लोकांना याच गोष्टी आवडत नाहीत. ते बालबुद्धीने वागले. यामधून एकप्रकारे त्यांच्याबद्दल लोकांचं मत खराब होतं. समजतं, हे किती बालबुद्धी आहेत. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा याला महत्त्व देऊ नये, ही आमची भूमिका होती,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं.
Pune News: शिवसेना शिंदे गटातील आमदाराविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल





