बीड : राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आठवडाभरापूर्वी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी बंडखोरी करत शिवसंग्राम पक्षाकडून बीड विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी संदीप क्षीरसागर विरुद्ध ज्योती मेटे असा सामना होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला.
कोण आहेत ज्योती मेटे?
ज्योती मेटे या मराठा आरक्षणाबाबत कायम आग्रही भूमिका घेणारे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. त्या प्रशासकीय अधिकारी होत्या. पती विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेटदेखील घेतली होती.