न्या.सूर्यकांत यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब; ‘या’ दिवशी पदाची सुत्रे स्वीकारणार
Updated On:

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांची गुरूवारी देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ते २४ नोव्हेंबरला पदाची सुत्रे स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई २३ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतील.
त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी नवे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस नुकतीच केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली. त्यानंतर सूर्यकांत यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतून स्पष्ट झाले.
सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांना सुमारे १५ महिन्यांचा कार्यकाळ लाभेल. ते वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२७ यादिवशी सेवानिवृत्त होतील. हरियाणात १० फेब्रुवारी १९६२ यादिवशी सूर्यकांत यांचा जन्म झाला. त्यांना मे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.





