The Pyramid Scheme : “फक्त चार लोकं जोडा आणि करोडपती व्हा!”‘The Pyramid Scheme मधून नेटवर्क मार्केटिंगच्या काळ्या जगाचा पर्दाफाश
The Pyramid Scheme : पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘ॲस्पिरंट्स’सारखे लोकप्रिय शो देणाऱ्या TVFची ही नवी पेशकश आहे. श्रेयांश पांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये परमवीर सिंग चीमा, रणवीर शौरी आणि शेखर सुमन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

The Pyramid Scheme : “गरीब असणं हे पाप आहे… पण मी सहा महिन्यांत नशीब बदललं, तुम्हीही बदलू शकता!” या संवादाने सुरू होणारा TVF ची नवी वेबसीरिज ‘The Pyramid Scheme’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली चालणाऱ्या मोठ्या फसवणुकीचं वास्तव दाखवणारी ही सिरीज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘ॲस्पिरंट्स’सारखे लोकप्रिय शो देणाऱ्या TVFची ही नवी पेशकश आहे. श्रेयांश पांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये परमवीर सिंग चीमा, रणवीर शौरी आणि शेखर सुमन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
२ मिनिटे ४२ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये नेटवर्क मार्केटिंगच्या चमकदार दुनियेआड दडलेलं भयावह वास्तव दाखवण्यात आलं आहे. हरिद्वारच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत गोल्डी नावाचा तरुण श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असतो. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो धडपड करत असताना त्याची भेट मनोज श्रीवास्तवशी होते आणि त्यानंतर तो पिरॅमिड स्कीमच्या जाळ्यात अडकत जातो.
ट्रेलरमध्ये शेखर सुमनचं पात्र गावोगाव फिरून लोकांना “फक्त चार लोकं जोडा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा” अशी स्वप्नं विकताना दिसतं. “मी माझ्या घरातला पहिला करोडपती होणार,” असा संवादही ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो. मात्र या स्वप्नांमागे मोठा घोटाळा आणि फसवणूक दडलेली असल्याचं पुढे स्पष्ट होतं.
ट्रेलरच्या शेवटी येणारा संवाद विशेष लक्ष वेधून घेतो. “तुमच्या मृत्यूनंतर खांदा देणारे चार लोक, जिवंतपणी शोधा,” असं म्हणणाऱ्या पात्राला प्रत्युत्तर देताना अंजन श्रीवास्तव म्हणतात, “तुम्ही जे काही केलंय, त्यानंतर हे चार लोक मरणानंतरसुद्धा खांदा द्यायला येणार नाहीत.” अशा खास शैलीतले संवाद सिरीजबद्दल उत्सुकता वाढवतात.
‘The Pyramid Scheme’ ही वेब सिरीज ५ जून २०२६ या दिवशी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये अल्फिया जाफरी, आशिष राघव, अखिलेंद्र मिश्रा, स्मिता बन्सल, विजय कुमार, इंद्रेश मलिक, रवी बहल, सुशांत सिंग, सोनल झा आणि सदानंद पाटील यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : Anu Agarwal : ‘आशिकी’ने बनवलं सुपरस्टार, अपघाताने हिरावली ओळख; अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी





