Middle East Crisis: अमेरिका-इराण करारा दरम्यान भारतासाठी आनंदाची बातमी : तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी केली पार
Middle East Crisis: पश्चिम आशियातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Middle East Crisis: पश्चिम आशियातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या आणखी एका टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे.
अनेक सागरी वाहतूक निरीक्षण संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. ‘निसोस केरोस’ नावाचे हे जहाज विशाखापट्टणमच्या दिशेने निघाले असून, ते ३ जूनपर्यंत त्याठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे.
२१ मे रोजी शारजाहहून निघाले Middle East Crisis:
मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले हे जहाज २१ मे रोजी शारजाहहून निघाले. भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजता ते भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ उत्तर अरबी समुद्रात दिसले.
जहाज ट्रॅकिंग संस्था ‘ऑकविझर’नुसार, विशाखापट्टणमच्या दिशेने येणारे ‘निसोस केरोस’ हे जहाज ‘अरेथुसा शिपिंग कॉर्पोरेशन’च्या मालकीचे असून ‘सायक्लेड्स मेरिटाइम कॉर्पोरेशन’द्वारे चालवले जाते. हे ३३३ मीटर लांबीचे जहाज आहे.
IRGC ने २४ तासांत २३ जहाजांना दिली परवानगी
इराणची वृत्तसंस्था इर्ना (IRNA) ने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) गेल्या २४ तासांत तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांसह २३ व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे.
या वृत्तानुसार, इराणी लष्कराच्या म्हणण्यानुसार, या सर्व जहाजांची वाहतूक आयआरजीसीच्या अधिकाऱ्यांशी औपचारिक समन्वय साधल्यानंतरच झाली. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांना कोणताही टोल भरावा लागला की नाही, हे अस्पष्ट आहे. इराणने यापूर्वीच म्हटले आहे की ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी टोल आकारू शकते.
सागरी वाहतूक नियंत्रणासाठी एजन्सीची स्थापना Middle East Crisis:
या महिन्यात, इराणने सागरी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ नावाच्या एजन्सीच्या स्थापनेची घोषणा केली. तथापि, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गातून जाण्यासाठी टोल आकारणे बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. अमेरिकेने इराणकडे सामुद्रधुनीतून मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान पेरलेले सुरुंग
फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भूसुरुंग पेरले आणि जहाजांवर हल्ले केले. इराण युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
होर्मुझ खुला ठेवण्याचा ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी म्हणाले, “होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली राहील.” इराणच्या कृतीमुळे जगातील सुमारे २० टक्के गॅस आणि तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, जो या मार्गातून जातो. यामुळे जागतिक ऊर्जा आणि आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
बुधवारी ट्रम्प यांनी अचानक धमकी दिली की, “जर ओमानने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी टोल आकारण्याबाबत इराणसोबत करार केला, तर अमेरिका ओमानवर हल्ला करू शकते.” ओमान इराणच्या समोर सामुद्रधुनीच्या पलीकडे वसलेले आहे.






