Junnar : दुष्काळग्रस्त यादीतून जुन्नर बाहेर
Junnar : आणे पठार विभाग हा कायम पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणारा भाग म्हणून ओळखला जातो.

बेल्हे : जुन्नर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न झाल्याने तालुक्यातील पठार भागातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः बेल्हे महसूल मंडळातील आणे, पेमदरा, शिंदेवाडी आणि नळवणे ही गावे सातत्याने पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करत असताना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शासनाच्या दुष्काळी अनुदान व सवलतींपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणे पठार विभाग हा कायम पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणारा भाग म्हणून ओळखला जातो. जुन्नर तालुक्यात पाच धरणे असूनही त्यांच्या पाण्याचा अपेक्षित लाभ पठार भागातील गावांना मिळत नसल्याची शेतकर्यांची तक्रार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्यास या भागातील शेतीवर त्याचा थेट परिणाम होतो. यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन पीक जळून गेले आहे.
शेजारी पारनेर दुष्काळग्रस्त
विशेष म्हणजे, आणे गावाच्या शेजारी असलेल्या पारनेर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, आणे पठारासह जुन्नर तालुक्यातील संबंधित गावांचा समावेश न झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी वाढली आहे. स्थानिक परिस्थिती, पर्जन्यमान आणि पिकांची झालेली हानी यांचा वस्तुनिष्ठ विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. आणे, पेमदरा, शिंदेवाडी आणि नळवणे या गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकर्यांना शासनाचे अनुदान आणि दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
आणे पठार विभागातील आणे, पेमदरा, शिंदेवाडी आणि नळवणे ही गावे दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने येथील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असून शेती मोठ्या संकटात आहे. बेल्हे महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकर्यांना तातडीने अनुदान व आवश्यक मदत द्यावी. शेतकर्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल.
-प्रियंका दाते, सरपंच, आणे





