Junnar Police : सराईत गुन्हेगारांना जुन्नर पोलिसांचा दणका; एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई
Junnar Police : पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचा सराईत गुन्हेगारांना अल्टिमेटम; जुन्नरमधील पाच जणांची टोळी जिल्ह्याबाहेर हद्दपार.

Junnar Police – जुन्नर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी अकलाख आसिफ शेख (रा. कागदीवाडा, जुन्नर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्याची रवानगी विदर्भातील अकोला मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली आहे.
वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर व परिणामकारक कारवाई करण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार जुन्नर पोलिसांनी शेख याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून त्याच्यावर स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तातडीने अकोला कारागृहात हलवले.
ही कारवाई उपअधीक्षक धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.दरम्यान, जुन्नर पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी इतरही कठोर कारवाया केल्या आहेत. यामध्ये सोयाबीन चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तसेच गोवंश वाहतूक व कत्तल प्रकरणी दोन जणांना आणि शहरातील एका आरोपीला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही आणि भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी यावेळी स्पष्ट केले.





