Crime News : जुन्नर येथील खून प्रकरणातील फरार आरोपी वारजे पोलीसांकडून अटक

ओझर : जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेल्या गुन्हा दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीस वारजे पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या अटक केली आहे.
सदर गुन्ह्यात फिर्यादी शरद निंबा साबळे (वय ४२ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता, मौजे निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरील अंगणात घर व जमिनीच्या वादाच्या कारणावरून आरोपी तुषार निंबा साबळे याने फिर्यादी यांच्या पत्नी अरुणा शरद साबळे (वय ३८ वर्षे) हिच्यावर चाकूने छाती व हातावर वार करून तिचा निर्घृण खून केला होता. सदर गुन्हा दिनांक ५ जानेवारी रोजी जुन्नर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून आरोपी तुषार निंबा साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) हा फरार होता. दरम्यान, तो वारजे परिसरात आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री. सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली. त्यांनी ही माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे यांना कळवली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदीप चौक, वारजे परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे येताच पीएसआय रायगोंडा यांनी तात्काळ झडप घालून त्यास ताब्यात घेतले. सदर बाब त्वरित जुन्नर पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आली. त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशनचे एक पथक तातडीने वारजे येथे दाखल झाले व उशिरा रात्री वारजे पोलीस स्टेशन येथून आरोपीचा ताबा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जुन्नरकडे रवाना झाले आहे.
सदर आरोपीस उद्या जुन्नर येथील मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ३,संभाजी कदम, तसेच सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे व निलेश बडाख यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सिद्धेश्वर रायगोंडा, पीएसआय नायकवडे व पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई म्हणजे आंतरजिल्हा समन्वय, तत्परता व प्रभावी गुप्त माहितीच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्याचा उत्कृष्ट नमुना असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत सज्ज असल्याचा ठोस संदेश आहे.,





