Junnar News : बिबट्या दिसताच वाजणार सायरन! ऊसतोडणी मजुरांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचे मोठे पाऊल

प्रभात वृत्तसेवा
लेण्याद्री – जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात श्रीविघ्नहर व भीमाशंकर सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत असताना, बीड, उस्मानाबादसह विविध भागातून हजारो ऊसतोडणी मजूर येथे येत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांतील वाढते हल्ले पाहता यंदाच्या हंगामात बिबट्यांच्या उपद्रवात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऊसतोडणी मजुरांनी अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
ऊस हे बिबट्याचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान बनले असून, हंगामात बिबट्याची पिल्लेही सापडत असल्याने हल्ले वाढतात. मजूर भल्या पहाटे कामावर निघत असल्याने धोका अधिक आहे. या पार्श्वभूमीवर, बिबट्याला रोखण्यासाठी वन विभागाने आता अत्याधुनिक एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रणाली विकसित केली आहे. जुन्नर वनविभागातील ५० बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यामध्ये उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरनेट आणि सायरनचा समावेश आहे.
या प्रणालीमुळे बिबट्या आल्यास तातडीने त्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना पाठवली जाते. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी जुन्नर तालुक्यात २१ ठिकाणी ही यंत्रणा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, या संदर्भातील एक ॲप विकसित करण्याचे काम सुरू असून ते परिसरातील ग्रामस्थांना उपलब्ध केले जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना तत्काळ धोक्याची सूचना मिळेल.





