Junnar News: जुन्नरकरांचा श्वास कोंडला; शहरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – ऐतिहासिक जुन्नर शहरात सध्या धुळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने नागरिक, दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेते हैराण झाले आहेत. या वाढत्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, सर्दी, खोकला आणि डोळ्यांची आग होण्यासारखे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिकांना दिवसभर मास्कचा वापर करावा लागत आहे.
शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली जुनी घरे व वाड्यांची पाडापाड आणि नवीन बांधकामांमुळे उडणारी धूळ घराघरांत शिरत असल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रस्त्यावरील धुळीचे थर केवळ आरोग्यालाच नव्हे तर मालमत्तेलाही फटका बसवत आहेत. दुकाने आणि घरांधील महागड्या फर्निचरवर धुळीचे थर साचत असल्याने महिलांना दररोज अतिरिक्त साफसफाई करावी लागत आहे.
तसेच घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची अवस्था दयनीय होत असून, ती वारंवार धुण्यासाठी वाहन मालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक धुळीचा त्रास कमी करण्यासाठी घरासमोर पाण्याचे सडे मारतात, ज्यामुळे दररोज हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे, मात्र तरीही धुळीची समस्या कायम आहे.
शहरातील व्यापारी पेठ आणि निवासी भागातील या गंभीर समस्येकडे जुन्नर नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. बांधकामे करताना धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संरक्षक जाळ्यांचा वापर करणे आणि रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आग्रही मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने कार्यवाही न झाल्यास संताप व्यक्त केला जात आहे.





