Junnar ZP Election – जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असला, तरी वरवर दिसणारी एकजूट आणि आतून उसळणारी नाराजी यामुळे संपूर्ण तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पातळीवर समन्वयाचे संकेत दिले जात असताना स्थानिक कार्यकर्ते मात्र अजूनही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. तालुक्यातील नारायणगाव, बोरी, सावरगाव, बारव, ओतूर, आळे, डिंगोरे आणि राजुरी या जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत कुरघोड्या, नाराज बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे. काही गटांत एकाच विचारसरणीतील कार्यकर्ते परस्परविरोधी बाजूंनी उभे राहिल्याने ‘आपला विरुद्ध आपलाच’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात काम केलेले कार्यकर्ते आज अचानक एकत्र येण्याच्या अपेक्षेमुळे गोंधळात सापडले आहेत. वर आदेश वेगळे, खाली वास्तव वेगळे अशी कुजबुज अनेक गटांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे प्रचार करताना कार्यकर्त्यांचा उत्साह कमी, तर संभ्रम अधिक असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणात शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोघांचेही तालुक्यात स्वतंत्र कार्यकर्ता जाळे होते; मात्र उमेदवारी नाकारल्यावरून विस्कटलेले आहे. आता या निवडणुकीत नेमकी दिशा कोणती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ पातळीवरील संकेत प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर कितपत उतरतात, हेच या निवडणुकीचे गणित ठरवणार आहे. बंडखोरीचा फटका कोणाला सध्या अनेक गटांत अपक्ष उमेदवार निर्णायक ठरण्याची शक्यता असून, बंडखोरीचा फटका कोणाला बसणार आणि त्याचा फायदा कोण उचलणार, हे चित्र मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेवर अखेर कोणाची वर्णी लागणार, याकडे जुन्नर तालुक्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे.