Bhimashankar Temple: भीमाशंकरला जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा; विनापास दर्शन सुरू होताच नियमांत झाला ‘हा’ बदल
Bhimashankar Temple: मंदिर परिसरात विकासकामांचा वेध आणि मर्यादित जागा; विनापास दर्शनामुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान.

Bhimashankar Temple – सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात भाविकांसाठी विनापास दर्शन व्यवस्था गुरुवार (दि. 18) पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरात गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करताना प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असल्याने दर्शन व्यवस्था आणि सुरक्षेचे नियोजन अधिक जिकिरीचे बनले आहे. विशेषतः समामंडप उभारणीसाठी बसविण्यात आलेले लोखंडी पाईप, बांधकाम साहित्य आणि मर्यादित उपलब्ध जागा यामुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिक दक्षतेने करावे लागत आहे. विनापास दर्शनाची माहिती मिळताच राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर येथे दाखल होत आहेत. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन यांच्या समन्वयातून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाविकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था, दर्शन रांगा आणि मंदिर परिसरातील शिस्त यावर विशेष भर दिला जात आहे. आगामी शनिवार-रविवार तसेच धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व्यवस्था राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
“भीमाशंकर येथे विनापास दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढत आहे. कोणतीही गैरसोय अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.”
– सागर पवार, सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव





