Junnar Financial Fraud : जुन्नर नगरपरिषदेत १ कोटी ८५ लाखांचा बँक घोटाळा; बनावट खात्याद्वारे ठेकेदाराला लावला चुना
Junnar Financial Fraud : बनावट बँक खाते बनवून ठेकेदार आणि जुन्नर नगरपरिषदेची १ कोटी ८५ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Junnar Financial Fraud – बनावट बँक खाते बनवून ठेकेदार आणि जुन्नर नगरपरिषदेची १ कोटी ८५ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिजीत पांडुरंग जाधव (वय ४७ वर्षे, राह. छ. संभाजीनगर) यांनी १० मार्च २०२४ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत जुन्नर नगरपरिषदेमध्ये घडलेल्या सदर प्रकाराबाबत दि. २५ मे रोजी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, १) सुजित भानुदास घोडके, २) बाळासाहेब गुलाब गायकवाड आणि ३) परशुराम निवृत्ती शेलार (सर्वजण राह. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित जाधव यांच्या मे. बालाजी इंटरप्राईजेस संभाजीनगर या फर्मला जुन्नर शहरात ११० हायमास्ट दिवे बसविण्याचे काम ऑक्टोबर २०२४ मध्ये नगरपरिषदेने दिले होते. कामाची एकूण रक्कम ५ कोटी ८८ लाख ९९ हजार रुपये होती.
सुजित घोडके यांनी हे काम मी पूर्ण करून देतो, असे सांगून जाधव यांच्यासोबत कामगार, कच्चा मालपुरवठा, कामावर देखरेख, कामाची गुणवत्ता याबाबत ठराव केले होते. दरम्यान, नगरपरिषदेने दिलेल्या कामापैकी दोन कामांची रक्कम अभिजित जाधव यांना मिळाली होती. परंतु उर्वरित काम होऊनही रक्कम न मिळाल्याने जाधव यांनी नगरपरिषदेकडे विचारणा केली असता, उर्वरित रकमेतून शासकीय वजावट करून १ कोटी ८५ लाख ३६ हजार ४४० रुपये आरटीजीएस द्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदार जाधव यांनी बँक खात्याची माहिती घेतली असता सदरचे खाते सुजित घोडके यांचे सासरे बाळासाहेब गुलाब गायकवाड यांच्या नावाने असल्याचे स्पष्ट झाले. तर, खात्याचा मोबाईल नंबर शेलार यांचा असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी पुण्यातील एका बँकेत बनावट खाते उघडून तिथे वरील रक्कम फसवणूक करून वर्ग केल्याचे आढळून आल्याने जाधव यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे करीत आहेत.






